Study from Home

सजीव – पेशीरचना

 

                     पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक (Structural) वकार्यात्मक (Functional) असा मूलभूत घटक आहे.  पेशी, ऊती, इंद्रिय व इंद्रियसंस्था अशा शरीरपातळ्या असतात. सर्व सजीवांची रचना व कार्ये ही पेशींच्या पातळीवर होत असतात. पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात.

 सजीवांतील संघटन

                    रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इ. स. 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला, तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली. या कप्प्यांना त्यांनी पेशी हे नाव दिले. Cell म्हणजे कप्पे. लॅटिन भाषेत ‘सेला’ (Cella) म्हणजे लहान खोली होय.

                  एम. जे. श्लायडेन थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्यारचनेविषयी सिद्धान्त मांडला, की ‘सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे.’ 1885 मध्ये आर. विरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले.

                   भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटीने मोठी दिसते.  अन्टोन ल्युवेन्हॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले व जीवाणू नलिका (Bacteria), आदिजीव (Protozoa) यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले. पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या  आपल्याला दिसू शकत नाहीत. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते. पेशीनिरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो.

                      सजीवांच्या पेशींच्या आकारांत विविधता असते. त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो.

 

                       तांबड्या रक्तपेशी ,पृष्ठभागावरील पेशी अमीबा ,स्नायुपेशी ,अंडपेशी ,मेदपेशी ,अस्थिपेशी ,स्पायरोगायरा , चेतापेशी शुक्रपेशी यांचे आकार आपण पाहू शकतो.

 पेशींचे आकार 

                      गोलाकार (Circular), दंडाकार (Rod-shaped), स्तंभाकार (Columnar), सर्पिलाकार (Spiral),अंडाकृती (Oval), आयताकार (Rectangular) अशा विविध आकारांच्या पेशी आढळून येतात.सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशीअंगके म्हणतात. या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक (Electron microscope) वापरतात कारण याच्या साहाय्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन (Magnification) होऊन त्याची दोनअब्ज पटपर्यंत (2X10) मोठी प्रतिमा (Image) अभ्यासता येते. 

                     प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. या पेशी पटलांच्या साहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका (Cell wall)असते त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका (Vacuole) आढळतात. या सर्व दृश्यकेंद्रकी पेशी (Eukaryotic cell) आहेत.

                   इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दिसणारी पेशी

वनस्पती पेशी ,   प्राणी पेशी

                       सजीव पेशीत पुढील अंगके असतात.

 मुक्त रायबोझोम ,लयकारिका ,पेशीभित्तिका ,पेशीपटल ,गॉल्जीपिंड ,हरितलवक ,केंद्रक ,आंतरर्द्रव्यजालिका ,रिक्तिका ,पेशीद्रव ,तंतुकणिका

पेशीभित्तिका : पेशीभित्तिका (Cell wall) हे पेशीचे सर्वांत बाहेर असणारे आवरण (Covering) आहे.पेशीभित्तिका फक्त वनस्पतीपेशींमध्येच आढळते.

पेशीपटल: पेशीपटल (Plasma membrane) हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक,लवचीक (flexible) असते व ते प्राणी पेशीचे सर्वांत बाहेरचे आवरण असते.

पेशीद्रव (Cytoplasm) : पेशीमध्ये पेशीकेंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला पेशीद्रव म्हणतात.पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक यांदरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात.

 पेशी अंगके (Cell Organelles) : यांमध्ये प्रामुख्याने केंद्रक (Nucleus),आंतरर्द्रव्यजालिका (Endoplasmic reticulum) गॉल्जिपिंड (Golgi complex) तंतुकणिका (Mitochondria), लवके (Plastids) यांचा समावेश होतो. वनस्पती पेशींमध्ये हरितलवक असते.

                               वनस्पती व प्राणी पेशीमधील काही घटक समान तर काही घटक वेगवेगळे असतात .

केंद्रक हे पेशीचे सर्वांत महत्त्वाचे अंगक आहे. त्याच्या भोवती दुहेरी, सछिद्र (Porous) पटल असते. पेशींची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते. 

आंतरर्द्रव्यजालिका हे एक विस्तृत, जाळीदार अंगक आहे. हे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जिपिंडाकडे पाठवण्याचे काम करते. 

गॉल्जिपिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी (Flat sacs)तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम गॉल्जिपिंडामार्फत होते.

 तंतुकणिका व लवके ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जाकेंद्र (Power house)असे म्हणतात. वनस्पती पेशींमधील हरितलवके प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतात. 

रिक्तिका ह्या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. प्राणीपेशींमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात तर वनस्पतीपेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते.

Leave a Comment