Study from Home

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह – जैन धर्म

                       वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीकसारीक तपशीलांचे नको एवढे महत्त्व वाढले. त्यांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक नव्हती . वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत राहिले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला, यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता. तो सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे, शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली.

                    इ.स.पू. सहाव्या शतकात सर्वसाधारण सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे, याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो, हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे.

जैन धर्म

                 जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. या धर्मात ‘अहिंसा’ या तत्त्वाला महत्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण २४ तीर्थकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोविसावे तीर्थंकर होत.

वर्धमान महावीर (इ.स.पू. ५९९ ते इ.स.पू. ५२७)

               आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते.   त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. साडेबारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान ‘केवल’ म्हणजे ‘विशुद्ध” स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना ‘केवली’ असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा, यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे, म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना ‘जिन‘ म्हणजे ‘जिंकणारा’, असे म्हटले जाऊ लागले. ‘जिन’ या शब्दापासून जैन शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते.

              ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे उपदेश केला लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर ‘अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते. आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत, त्यांना ‘समवसरण’ असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत, हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णांतील लोकांना प्रवेश असे.

* पंचमहाव्रते :

                 पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम.

१. अहिंसा : कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल, असे वागू नये.

२. सत्य : प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी.

३. अस्तेय : ‘स्तेय’ म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे                           म्हणजे चोरी. चोरी न करणे, म्हणजे अस्तेय.

४. अपरिग्रह : मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे,                            म्हणजे अपरिग्रह.

५. ब्रह्मचर्य : शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य,

* त्रिरत्ने : 

                त्रिरत्ने म्हणजे १. ‘सम्यक् दर्शन’, २. ‘सम्यक् ज्ञान’ आणि ३. ‘सम्यक् चारित्र’ ही तीन तत्त्वे, 

                सम्यक् याचा अर्थ ‘संतुलित’ असा आहे.

१. सम्यक् दर्शन : तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे.

२. सम्यक् ज्ञान : तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून, त्याचा सखोल

                          अर्थ  समजून घेणे.

३. सम्यक् चारित्र : पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे.

उपदेशाचे सार : 

                महावीरांच्या उपदेशातील ‘अनेकान्तवाद’ म्हटला जाणारा सिद्धान्त सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकान्त या शब्दातील ‘अन्त’ या शब्दाचा ‘पैलू’ असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुस-या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धान्तात मानण्यात सिद्धान्तामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते.

                मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू दया, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला.

Leave a Comment