प्रयोगशाळेसाठी वृत्तपत्र विकणारा थॉमस अल्वा एडिसन
‘पण हे असं का?’ एडिसनने वर्ग शिक्षकाला विचारलं. शिक्षकाने त्याच्या प्रश्नाकडे मुळीच लक्ष दिले नाही. तो नेहमीच असे प्रश्न विचारायचा. एडिसन हटून बसला उत्तरासाठी. शिक्षकाने मग त्याचं नावच काढून टाकलं शाळेतून. नाव काढून टाकताना शेरा मारला की हा मुलगा कमी डोक्याचा आहे, म्हणून. एडिसनची आई शिक्षिका होती तिने त्याला थोडं फार घरच्या घरी शिकवलं. शालेय शिक्षणही धड झालेलं नसलेला एडिसन मात्र पुढील आयुष्यात जगप्रख्यात शास्त्रज्ञ झाला.
शाळा नाही, मग एडिसनचे काही काही उद्योग चालायचे. घरीच त्याने एक लहान प्रयोगशाळा सुरू केली. प्रयोगशाळेसाठी पैसा लागतो. तो मिळवण्यासाठी एडिसन ग्रॅण्डट्रंक रेल्वेत गोळ्या विकायचा, वृत्तपत्रं विकायचा, आहे की नाही खटपटी पोरगा! त्याच काळात त्याने एक छोटसं तार पाठवायचं यंत्र तयार केलं. दक्षिण अमेरिका विरुद्ध उत्तर अमेरिका ही लढाई तेव्हा सुरू झाली. युद्धाच्या बातम्यांची वृत्तपत्रांची मागणी वाढली. दुसऱ्यांची वृत्तपत्र विकण्याऐवजी आपणच स्वतः वृत्तपत्र काढून ते विकलं तर? एडिसनच्या मनात हा विचार आला. त्याने एक छोटेखानी छापखाना विकत घेतला. तो रेल्वेतच लावून दिला. रेल्वेतच पेपर छापायचा अन तो रेल्वेतच विकायचा.
एकदम ताज्या, ताज्या बातम्या! छापखान्यासोबत धावत्या रेल्वेत त्याने आपली प्रयोग शाळा सुरु केली. मात्र हे सारं थोडे दिवस सुरू राहिलं. एक दिवस त्याच्या प्रयोगशाळेत अचानक आग लागली. रेल्वे अधिकाऱ्याने त्याची प्रयोगशाळा रस्त्यावर फेकून दिली. चालत्या गाडीत वृत्तपत्रंही विकण्याची बंदी घातली. आली की नाही अडचण. पण एडिसन अशा अडचणींना घाबरणारा नव्हता. स्टेशन मास्तरच्या मुलाला जोरदार अपघात होता होता एडिसनने त्याला वाचवलं. स्टेशन मास्तर त्याच्यावर खूष झाला. त्याने एडिसनला तार पाठवण्याचं सगळं काम शिकवून दिलं.
एडिसनने तारयंत्र पूर्वीच तयार केलं होतं. हे ज्ञान आणखी उपयोगी पडलं. तो न्यूयॉर्क येथे काम शोधण्यासाठी गेला. त्याला लवकरच
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या टेलिग्राफ ऑफीसमधे नोकरी मिळाली. एडिसनने त्याच्याजवळचं तार पाठवण्याचं यंत्र तेथील मुख्य अधिकाऱ्यास दाखवलं. ते यंत्र फार मोठ्या रकमेस त्यांनी विकत घेतलं. एडिसनचे दिवस पालटले. त्याने आपली अद्यावत प्रयोगशाळा स्थापन केली. वेगवेगळे प्रयोग तो करू लागला. नवीन नवीन शोध लावू लागला. ग्रामोफोन, विजेचे बल्ब, सिनेमासाठी कॅमेरा, टाइपरायटर साठी यंत्र इत्यादी शोध त्याने लावले. एडिसनने अनेक नवीन नवीन शोध लावले आहेत. सतत काही ना काही कार्य करत राह्यचं हे जणू त्याचं व्रत होतं. साहजिकच त्यांनी एक हजारच्या जवळपास पेटंट घेतली.
११ फेब्रुवारी १८४७ रोजी जन्मलेला एडिसन १८ ऑक्टोबर १९३१ रोजी अमेरिकेतच मरण पावला. केवळ एक टक्का ज्ञान अन
नळ्याण्णव टक्के परिश्रम हे माझ्या यशाचं गमक आहे, असं तो नम्रपणे सांगत असे.