Study from Home

ओळख शास्त्रज्ञांची – टेलिफोनचा जनक बेल

हॅलो हॅलो ….. टेलिफोनचा जनक बेल
.
उन्हाळ्याच्या सुटीत मुलं घरात बसून खूप छान छान खेळ करत असतात. दोन डबे घ्यायचे, लांब, थोडी जाड दोरी घ्यायची. डब्यांना मधोमध खिळ्याने छिद्रं पाडायची, दोरीच्या दोन्ही टोकांना गाठी मारायच्या अन दोन टोकांना दोन डबे बांधायचे म्हणजे दोरीने ओवून घ्यायचे. एक डबा एकाने हातात धरायचा, दुसरा डबा दुसऱ्याने हातात धरून दोरी ताठ होईपर्यंत दूर घेऊन जायचं. एकाने त्याच्या
हातातील डबा तोंडाला लावायचा तर दुसऱ्याने कानाला. हा झाला टेलिफोन, एकजण बोलतो, दुसरा ऐकतो.

असाच टेलिफोन प्रथम केला होता अलेक्झांडर ग्रॅहम बेल अन थॉमस वॅटसन यांनी, १२० वर्षापूर्वी! २ जून १८७५ रोजी टेलिफोनचा
शोध लागला.बेल याने हे उपकरण तयार केलं. तो एका खोलीत तर वॅटसन दुसऱ्या खोलीत होता. प्रथम बेलने त्याच्या हातातील डब्यावर बोटाने टिचक्या मारल्या, दुसऱ्या खोलीतील वॅटसनला त्याचा आवाज नीट ऐकू आला. नंतर बेल आपल्या हातातील डब्यात काही बोलला,
‘वॅटसन, बॅटसन लवकर ये. मला तुझ्याशी काही काम आहे,’ अशा अर्थाचं तो बोलला. वॅटसनला ते शब्द स्पष्ट ऐकू आले.
एका खोलीत बोललेलं दुसऱ्या खोलीत कसं ऐकू आलं? बोललं की ध्वनीलहरी निर्माण होतात. त्या दोरीबरोबर या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातात. ध्वनीलहरी कंपनामुळे निर्माण होतात. या प्रयोगात यश आल्यावर बेलने मग टेलिफोनवर खूप काम केलं. दोरीऐवजी
धातूची तार अन डब्यांऐवजी माऊथपीस आणि रिसीव्हर निर्माण केले.

एका तारेद्वारे एकाहून अनेक जणांशी बोलण्यासाठी टेलिफोन एक्स्चेंज निर्माण झाले. आज तर या ध्वनीलहरी उपग्रहांमार्फत नेता येतात अन देशातील व जगातील कुठल्याही ठिकाणी बोलता येते. हे अर्थातच सातत्याने केल्या जाणाऱ्या संशोधनामुळे शक्य झालं आहे.
टेलिफोनचं तयार केलेलं उपकरण घेऊन बेल गावोगावी,देशोदेशी गेला. अमेरिकेतही जाऊन त्याने यशस्वीपणे प्रयोग करून
दाखवले. १८७६ मधे त्याने पेटंट घेतलं टेलिफोनचं. बेलच्या नावे टेलिफोनचा शोध ओळखला जातो. मात्र तत्पूर्वी काहींनी टेलिफोन
तयार केला होता, हेही तेवढंच खरं.

दोन देशातील फोनची व्यवस्था कालांतराने निर्माण झाल अशा प्रकारची पहिली व्यवस्था सुरू करण्याचा मान बेलला देण्यात
आला. एका टोकाला बेल तर दुसऱ्या टोकाला वॅटसन. दोघांमधील अंतर होतं हजारो मैल! उद्घाटन करण्यासाठी बेलने रिसीव्हर
उचलला अन काय बोलावं? तो म्हणाला, ‘वॅटसन, वॅटसन, लवकर ये मला तुझ्याशी काही काम आहे.’ पहिल्यांदा तो हेच वाक्य बोलला
होता. ते ऐकून वॅटसन खूप मोठ्याने हसला, “आता ते कसं शक्य आहे, मी तर हजारो मैल लांब आहे तुझ्यापासून’ वॅटसनने उत्तर दिलं.

अलेक्झांडर ग्रॅहम बेलचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी इंग्लंडमधे झाला. त्याचा मृत्यू २ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. तोपर्यंत साऱ्या जगात टेलिफोनचं जाळं निर्माण झालं होतं. बेलचा मृत्यु झाला त्या दिवशी अमेरिकेत म्हणे एक मिनिट टेलिफोन बंद ठेवले होते, त्याच्या
स्मरणार्थ!