Study from Home

Olakh Shastrdnynachi.Jagdishchandra Bosh

वनस्पतीमधे संवेदना शोधणारा भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस


पूर्वी भारत हा जगातील सर्वात प्रगत देश होता. या देशात अनेक शोध लागलेले होते. विज्ञान अन गणित या विषयात येथील लोकांनी खूप महत्त्वाचे शोध लावले होते. थोर गणितज्ञ आर्यभट्ट, औषधीशास्त्राचा अभ्यासक चरक, नागार्जुन हा रसायन शास्त्रज्ञ,
शल्यतज्ज्ञ सुश्रुत अशी कितीतरी नावे सांगता येतात. ही सर्व विद्वान माणसं फार फार वर्षांपूर्वी होऊन गेली. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती कुठेही उपलब्ध होत नाही.

अणूवादाचा संशोधक कणाद हा असाच एक थोर विद्वान. त्याच्या बाबतीतही असंच म्हणावं लागतं. मात्र अलीकडल्या काळातील भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळू शकते. त्यापैकी एक म्हणजे जगदीशचंद्र बोस. मानवाप्रमाणेच पशुपक्ष्यांना संवेदना असतात. अनेक प्राणी माणसाळलेले आपण पहातो. कुत्रा, मांजर, हरिण हे प्राणी माणसासोबत राहतात. मात्र झाडंझुडपांनाही माणसाप्रमाणे, प्राण्यांप्रमाणे संवेदना असतात हे जगाला प्रथम दाखवलं जगदीशचंद्र बोस या भारतीय शास्त्रज्ञाने. वनस्पती ही देखील बाहेरील घटनांमुळे प्रभावित होते हे त्याने दाखवून दिलं. झाडांजवळ चांगलं संगीत लावलं तर ती मग माणसासारखं त्याचा आस्वाद घेऊ शकत असतील, कारण त्यांनाही संवेदना आहेत. हे सिद्ध करण्यासाठी जगदीशचंद्रांनी एक रोपटं घेतलं. एक रिकामी बाटली घेतली. बाटलीत एक विषारी पदार्थ ठेवला. त्या रोपट्याला बाटलीत ठेवलं. त्याची पानं बाहेर काढून ठेवली. थोड्याच वेळात पानं कोमेजून गेली. रोपटं मरून गेलं. रोपट्याच्या संवेदना पडद्यावर दाखवण्यासाठी त्यांनी एक यंत्र बनवलं होतं. त्याचं नाव क्रेस्कोग्राफ. त्या यंत्राशी रोपट्याला तारेने जोडायचं. मग एका पडद्यावर एक प्रकाश बिंदू दिसायचा. त्या बिन्दूच्या हालचालींवर वनस्पतीला काय वाटतंय, काय होतंय हे सहज समजायचं.

वनस्पती मरून गेली तर तो प्रकाशबिंदू दिसेनासा व्हायचा. वनस्पती शास्त्रातला हा असामान्य शोध होता.
३० नोव्हेंबर १८५८ रोजी मैमनसिंह या गावी त्यांचा जन्म झाला. मैमनसिंह आता बांगलादेश मधे आहे. जगदीशचंद्र बोस यांचा
मृत्यु गिरीडीह येथे २३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला
. त्या काळात भारतात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने त्यांना सर ही उपाधी देऊन सन्मानित केले होते. जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी तारायंत्रही शोधलं होतं. मात्र त्याचा प्रयोग करून दाखवण्यापूर्वीच मारकोनीने त्याचं पेटंट घेतलं. बिनतारी तारायंत्राचं श्रेय त्यामुळे मारकोनीकडे गेलं.