बोधकथा – स्वतःला जाणा – Moral Story
विवेकानंदांचे भारतभ्रमण सुरू होते. सत्याचा शोध घेत ते फिरत होते. एका रात्री नदी पोहून ते पलीकडच्या काठावरील महर्षी देवेंद्रनाथांच्या आश्रमात गेले. ध्यानस्थ बसलेल्या महर्षीना त्यांनी विचारले, ईश्वर आहे की नाही, हे मला जाणून घ्यायचे आहे. अर्ध्या रात्री येऊन हा प्रश्न विचारणारा तो युवक पाहून महर्षीसुद्धा घाबरले.
महर्षी त्या तरुणाला म्हणजे विवेकानंदांना म्हणाले, मुला तू खाली बैस. मग निवांत बोलू एवढे ऐकताच विवेकानंद त्यांना म्हणाले, आपल्याकडून काहीही मिळणार नाही. मी निघतो. दोन महिन्यानंतर हाच प्रश्न त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला. रामकृष्ण म्हणाले, तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर बोल. देव आहे किंवा नाही, याची चिंता सोडून दे. तुला जाणायचं आहे की नाही, एवढंच सांग.
विवेकानंद पहिल्यांदाच विचारात पडले. आतापर्यंत मी लोकांना पकडत होतो. मी आत्तापर्यंत विचारच केला नव्हता की माझी जाणून घ्यायची तयारी आहे किंवा नाही. रामकृष्णांजवळ अनुभव होता. फक्त शब्द नव्हते. अनुभवाजवळ टाळाटाळ नसते. संदिग्धता नसते, काहीही शंका नसतात. असे ज्ञान नेहमी आतून येते.
तात्पर्य : स्वत:ला जाणून घ्यायची इच्छा हवी. असं मिळवलेले ज्ञान आतून येते. ते कोणालाही हिरावून घेता येत नाही.