बोधकथा – आत्मपरिवर्तन – Moral Story
एका गावात एक लोभी राहात होता. प्रत्येक बाबतीतील त्याचा हव्यास वाढत होता; पण एके दिवस त्याला अचानक ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागला होता. त्याला वाटत होते, आता आपल्याकडे साऱ्या सुविधा आहेत. नाही तो फक्त ईश्वरच नाही. सगळ्या सुविधा आपण मिळवल्या; पण ईश्वराला कधी मिळवणार?
मग त्याने भगवी वस्त्रे परिधान करून पर्णकुटीत राहणे सुरू केले. एका रात्री तो दचकून उठला. त्याला जाणवले की, छपरावरून कोणीतरी चालत आहे. तो म्हणाला, कोण आहे? उत्तर आले, घाबरू नका, चोर नाही. तरुणाने विचारले, अहो, छतावर काय करताय? उत्तर आले, माझी शेळी हरवलीय, ती शोधतोय….
तरुण म्हणाला, डोकं ठिकाणावर आहे का? छतावर कधी शेळी शोधतात का? कशी असेल.ती? छतावरील व्यक्तीने उत्तर दिले, अरे मूर्खा, तू ज्या अस्वस्थ, लोभी इच्छेने आणि अतृप्त मनाने ईश्वराचा शोध घेतो आहेस, ते सुद्धा छतावरची शेळी शोधण्याइतकंच मूर्खपणाचं नाही का?
तात्पर्य :सत्याच्या आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी आत्मपरिवर्तन आवश्यक आहे.