Study from Home

भारत नदी प्रणाली

 भारत नदी प्रणाली 

उगमस्थान व त्यानुसार येणारी इतर वैशिष्ट्ये यांचा विचार करता भारतातील नद्यांचे हिमालयीन नद्या व द्वीपकल्पीय नद्या, असे मुख्यतः दोन प्रकार पडतात.

हिमालयीन नद्या

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे गंगा नदीप्रणाली, सिंधू नदीप्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली, अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते.गंगा नदीप्रणाली : अलकनंदा व भागीरथी  यांच्या एकत्रित प्रवाहासच पुढ़े गंगा  नदी म्हणून ओळखले जाते. यांपैकी अलकनंदा ही नदी उत्तर प्रदेश व तिबेट यां सीमाभागात ‘अलकापुरी’ येथे उगम पावते, तर भागीरथी ‘गंगोत्री’जवळ उगम पावते 

अलकनंदा व भागीरथी हे दोन प्रवाह ‘देवप्रयाग’ येथे एकत्र येतात. एकत्रीकरणानंतर गंगा म्हणून नामाभिधान पावलेली ही नदी हरिद्वाराजवळ मैदानात उतरते. यमुना, शोण व दामोदर या तिच्या उजव्या किनार्यावरील उपनद्या आहेत; तर रामगंगा, गोमती, घाघ्रा, गंडक कोसी आणि महानंदा या तिच्या डाव्या किनाऱ्यावरील  उपनद्या आहेत 

यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी तिला अलाहाबादजवळ मिळते. सरस्वतीचा प्रवाहही येथेच गंगेत विलीन होतो. गंगा नदी भारतात उत्तरांचल, उत्तर प्रदेश बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून वाहते. फराक्काच्या पुढे गंगेचा मुख्य प्रवाह आग्नेयेकडे वळून बांगलादेशात प्रवेश करतो. हा प्रवाह बांगलादेशात ‘पद्मा’ नावाने ओळखला जातो. या ‘पद्मे’ला म्हणजेच मूळच्या गंगेस बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. हा एकत्रित प्रवाह पुढे बांगलादेशात ‘चंदिपूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळतो.

ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली : 

ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह किंवा ओघ तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ उगम पावतो. तिबेटमधून वाहताना या प्रवाहास ‘त्सांगपो’ नावाने ओळखले जाते. अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत प्रवेश करताना या मूळ प्रवाहास दिबांग व लोहित या नद्या मिळतात. यांच्या एकत्रित प्रवाहासच ‘ब्रह्मपुत्रा’ असे म्हटले जाते.ब्रह्मपुत्रा प्रामुख्याने अरुणाचल, आसाम यांसारख्या देशाच्या ईशान्य भागातील प्रदेशांत पूर्व-पश्चिम अशी वाहत जाऊन पुढे बांगलादेशात गंगेस मिळते. 

ब्रह्मपुत्रा ही तीन वेगवेगळ्या देशांतून वाहत जाणारी अशी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नदी आहे. तथापि, तिचे खोरे भारतापुरते तरी स्वतंत्र आहे. आसाममध्ये तिचे स्वरूप प्रचंड झालेले दिसून येते.तिला आसाममध्ये फार मोठे पूर येत असल्याने तिला ‘आसामचे दुःखाश्रू’ असे म्हटल जाते. सुबानशिरी, कामेंग, धानाशिरी, जयभोरेली, मानस व तिस्ता या तिच्या उजव्या किनार्यावरील नद्या होत; तर भूरी, दिहिंग, दिसांग व कोपोली या तिच्या डाव्या किनार्यावरील नद्या होत. गोलपारा, गुवाहाटी, दिब्रुगड व सादिया ही ब्रह्मपु्रेच्या काठा वसलेली महत्त्वाची शहरे होत.

सिंधू नदीप्रणाली :

सिंधू नदी तिबेटमध्ये हिमालयात मानस सरोवराजवळ कैलास पर्वतावर ५,१८० मीटर उंचीवर उगम पावते व जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हर्दींत प्रवेश  करते. काश्मीरमधून ती लडाख आणि गिलगिट भागातून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते. काश्मीरमध्ये तिला श्योक, शिगार आणि गिलगिट या नद्या येऊन मिळतात. पाकिस्तानात ती नैऋत्य दिशेकडे वाहत जाऊन कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रास मिळते.

झेलम, चिनाब, रावी, सतलज व बियास या सिंधूच्या प्रमुख उपनद्या होत.

द्वीपकल्पीय नद्या

या नद्या मुख्यतः दक्षिणेच्या पठारावरील पर्वतरांगांमधून, जसे- सह्य, सातपुडा, अरवली- उगम पावतात. या मुख्यतः मोसमी पावसावर अवलंबून असतात; त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात कमी पाणी असते. या नद्यांचे प्रामुख्याने पूर्ववाहिनी नद्या व पश्चिमवाहिनी नद्या, असे दोन गट पडतात.

पूर्ववाहिनी नद्या : 

बहुतेक पूर्ववाहिनी नद्या द्वीपकल्पाच्या पठारी भागातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. या नद्यांनी त्यांच्या मुखाजवळ विस्तृत असे त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत.

गोदावरी प्रणाली : 

गोदावरीची लांबी सुमारे १,४५० कि. मी. असून, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील ती सर्वांत महत्त्वाची नदी होय. तिचे खोरे भारतातील दुसऱ्या व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील पहिल्या क्रमांकाचे मोठे खोरे असून, देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे १० टक्के भाग या खोऱ्याने व्यापला आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ ‘ब्रह्मगिरी’ येथे उगम पावणारी ही नदी प्रामुख्याने महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहते व आंध्र प्रदेशात राजमहेंद्रीजवळ पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरास मिळते. तिचे व तिच्या उपनद्यांचे खोरे महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पसरले आहे. तिची लांबी व महत्त्व लक्षात घेता तिला ‘दक्षिणेची गंगा’ म्हणून संबोधले जाते. मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता व इंद्रावती या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या होत. प्राणहिता व इंद्रावती यांच्या खोऱ्यांत पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने त्या अधिक महत्त्वाच्या आहेत.

कृष्णाप्रणाली : 

कृष्णा नदी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात ‘महाबळेश्वर’ येथे उगम पावते. १,२९० कि. मी. लांबीची ही नदी महाराष्ट्र तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशांतून वाहत जाते. कृष्णेचे खोरे हे गोदावरी खालोखाल द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील दुसरे महत्त्वाचे व मोठे खोरे गणले जाते. द्वीपकल्पीय भारतातील या दुसऱ्या क्रमांकाच्या नदीस एकूण २२२ उपनद्या मिळत असून त्यांपेकी २१ उपनद्या एकाहून अधिक राज्यातून वाहणार्या आहेत. कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा या कृष्णेच्या महत्त्वाच्या उपनद्या होत.

कावेरी नदीप्रणाली : कर्नाटक राज्यात कुर्ग जिल्ह्यात पश्चिम घाटात ‘ब्रह्मगिरी’ येथे उगम पावते. ७६० कि. मी. लांबीची ही नदी कर्नाटक, तामिळनाडूमधून वाहात जाऊन तामिळनाडूमध्ये कावेरीपट्टणमजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. हेमवती, लोकपावनी, शिमसा व अर्कावती या कावेरीच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत; तर लक्ष्मणतीर्थ, काविनी, सुवर्णगावती, भवानी व अमरावती या तिच्या उजव्या किनार्यावरील उपनद्या होत. कर्नाटकच्या पठारी भागातून तामिळनाडूच्या मैदानी प्रदेशात प्रवेशताना कावेरीच्या मार्गात ‘शिवसमुद्रम्’ हा प्रसिद्ध धबधबा निर्माण झाला आहे. जलसिचन व विद्युतनिर्मिती यासाठी हिची सुमारे ९० टक्के क्षमता वापरली जाते, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. कावेरीचे खोरे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे.

महानदीप्रणाली :

 ८९० कि. मी. लांबीची ही महत्त्वाची नदी मध्य प्रदेशातील छत्तीसगड विभागात उगम पावते व ओरिसामध्ये कटकच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागरास मिळते. कृष्णेच्या खालोखाल महानदीचे खोरे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील तिसर्या क्रमांकाचे खोरे गणले जाते.

पश्चिमवाहिनी नद्या

पश्चिमवाहिनी नद्या तीव्र उतारावरून वाहाणाऱ्या कमी लांबीच्या, उथळ व खळखळणार्या आहेत. पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये नर्मदा, तापी, सरस्वती, नेत्रावती, पेरियार इत्यादी महत्त्वाच्या नद्यांचा समावेश होतो. नर्मदा व तापी या विशेष महत्त्वाच्या पश्चिमवाहिनी नद्या होत.

नर्मदा नदी : 

नर्मदा नदी मध्य प्रदेशात अमरकंटकजवळ उगम पावून नैऋत्येकड वाहात जाते. शेवटी गुजरातमध्ये भडोचजवळ ती अरबी समुद्रास मिळते. नर्मदेचे खोरे  मुख्यत्वे मध्य प्रदेशातच पसरलेले असून त्या खोऱ्याचा फक्त दहावा हिस्सा गुजरातमध्ये आहे. सर्वसाधारणपणे आकारमानाने कावेरी खोऱ्याइतकेच असलेले हे खोरे कावेरीप्रमाणेच द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील चौथ्या क्रमांकाचे खोरे गणले जाते. बऱ्हनेर, बंजार, शार, शक्कर, दुधी व तवा या नर्मदेच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत; तर हिरण, ओरसांग, बारणा व कोलार या तिच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत.

तापी नदी : 

तापी नदी मध्य प्रदेशात बेतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. कमीअधिक प्रमाणात नर्मदेस समांतर अशीच वाहात जाऊन ती सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते. तापी नदीचे खोरे मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतील काही प्रदेशांत पसरलेले आहे. तापी नदीच्या मुखाजवळील काही भागाचा वाहतुकीसाठी उपयोग होतो. पूर्णा ही तापीची एक महत्त्वाची उपनदी आहे. याशिवाय बेतुल, पातकी, गंजाल, अणेर, अरुणावती, गोगाई इत्यादी तिच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या असून अंभोरा, खुरसी, वाघुर, गिरणा, बोरी, पांझरा या तिच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत.

साबरमती नदी :

 ही नदी राजस्थानात अरवली पर्वतात उगम पावून राजस्थान व गुजरात राज्यातून नैऋत्येकडे वाहात जाते व शेवटी खंबायतच्या आखातात अरबी समुद्रास मिळते. अहमदाबाद हे तिच्या काठचे महत्त्वाचे शहर होय.

मही  नदी : 

विंध्य पर्वतात उदयपूरच्या पूर्वेस उगम पावणारी ही नदी राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरातमधून वाहात जाऊन अरबी समुद्रास मिळते.

Leave a Comment