Study from Home

मानवी शरीर – पचनसंस्था

             आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते ?  आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का?

खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.

            पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो., अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर असते. त्यात प्रामुख्याने मुख/तोंड, ग्रसनी (Oesophagus ), जठर/ अमाशय (Stomach), लहान आतडे (Small intestine), मोठे आतडे (Large intestine), मलाशय (Rectum) आणि गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

            लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठरावीक ठिकाणी जोडलेल्या असतात. पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम व्यवस्थितपणे करत असतात. अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिय वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. 

दात (Teeth)

          अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार असून प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. प्रत्येक दातावर एनॕमल या कठीण पदार्थाचे आवरण असते.  एनमल हे कॅल्शिअमच्या क्षारांपासून बनलेले असते. लाळेमध्ये टायलीन (अमायलेज) नावाचे विकर असते. त्यामुळे स्टार्चचे (पिष्टमय पदार्थ) रूपांतर माल्टोज या शर्करत होते.

          सजीवांच्या शरीरात स्त्रवणारे व विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ पचन संस्थेतील विकर खाद्यपदार्थांत बदल घडवून आणतात. ते केवळ उत्प्रेरकाचे (Catalyst) कार्य करतात. विकरांशिवाय चयापचय क्रिया शक्य होत नाही. विकरे ही एक प्रकारची प्रथिने असतात. विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. तोडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले (Chewed) जाते. त्यांचे  बारीक बारीक तुकडे होतात.

ग्रसनी / घसा :   अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.

यकृत :   यकृत ही शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे कार्य मुख्यत्वे   ग्लुकोजचा साठा करणे हे आहे. त्याच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. पित्ताशयात यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. पित्तरसामुळे स्निग्धपदार्थांच्या पचनास  मदत होते. पित्तरसात क्षार असतात.

लहान आतडे :   लहान आतडे सुमारे सहा मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. या आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे कार्य लहान आतड्यामध्ये होते.

लाळग्रंथी :  कानशिलांजवळ आणि जिभेखाली असलेल्या घशाजवळ वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते.

ग्रासिका : ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते.

स्वादुपिंडः  स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात अनेक विकरे असतात.

जठर : अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्रवतो. जठरात आलेले  अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्यूकस (श्लेष्म) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यत्वे  प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस (Gastric juices) मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते.

मोठे आतडे : मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या सुरुवातीच्या भागाला ‘अपेंडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर पचन न झालेले अन्न आणि  पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रिया झाल्यानंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. 

पचन संस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी त्यांचे स्त्राव व कार्य

तोंड – लाळग्रंथी ,लाळ, टायलीन 

कार्य:  पिष्टमय पदार्थांची रूपांतर माल्टोज मध्ये करणे

जठर- जठर भित्तिका, जाठर रस –  

 हायड्रोक्लोरिक आम्ल – अन्न  आम्लयुक्त करणे ,

 पेप्सिन – प्रथिनांचे विघटन करणे, 

म्यूकस (श्लेश्म) – जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणे.

यकृत- पित्तरस 

अन्न  आम्लारीयुक्त करणे, मोठ्या मेद कणांचे लहान कणांत रूपांतर (पायसीकरण) करणे.

स्वादुपिंड –स्वादुरस 

ट्रीप्सिन- प्रथिनांचे रुपांतर अमिनो आम्लात करणे 

लायपेज – मेदाचे रूपांतर मेदाम्ले   ग्लिसेरॉलमध्ये करणे 

अमायलेज – पिष्टमय पदार्थांचे रुपांतर शर्करेत  करणे.

लहान आतडे – आंत्ररस

 प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे, मेदाचे मेदाम्ल व ग्लिसेरॉल मध्ये रूपांतर करणे.

आरोग्य रक्षण :

                  व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शारीरिक आरोम्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रियसंस्था (Organ systems) सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे, असे आपण म्हणतो; परंतु धूम्रपान, तंबाखू सेवन, मदयपान यांसारख्या घातक सवयी आरोग्य बिघडवतात. 

               तंबाखू सेवनामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचनसंस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात. तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. तंबाखूचे कण दात, हिरड्या (Gums), तोंडाच्या आतील त्वचा यांना चिकटून बसतात व हळूहळू इजा पोहोचून तो भाग खराब करण्याचे काम करतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येते, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात. घसा तसेच आतड्याचा दाह होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू ओढवतो.

              त्यामुळे धूम्रपान, तंबाखू सेवन, मदयपान यांसारख्या घातक सवयीपासून आपण दूर राहीले पाहिजे. आपल्या आरोग्याचे रक्षण केले पाहिजे.

Leave a Comment