देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे ।।धृ।।
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसूदे
नांदोत सुखे गरीब अमीर एकमंतानी
संग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलामाजी वसू दे।
दे वरचि असा दे ।।१।।
सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना।
हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना।
उद्योगी तरुण शीलवान येथे असू दे।
दे वरचि असा दे ।।२।।
जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खळ-निंदका मनीही सत्य न्याय वसू दे।
दे वरचि असा दे ।।३।।
सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी
ही नष्ट होऊ दे विपती भीती बावरी
तुकडयादास सदा या सेवेमाजी वसू दे।
दे वरचि असा दे ।।४।।
-श्री संत तुकडोजी महाराज