देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।।धृ.।।
कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शिर उंच उच व्हावळे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।१।।
येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला, येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला, गीतख्य अमृताचे
आचंद्र नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।२।।
येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा
येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे
आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।३।।
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंड घ्यावी, या जागत्या प्रथेचे
येथे शिव-प्रतापी, नरसिंह योग्यतेचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ।।४।।
– ग. दि. माडगूळकर