Study from Home

मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे

द्रव्य (Matter)

                             वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे पदार्थ या समानार्थी म्हणून द्रव्य हा शब्दसुद्धा वापरतात, मात्र शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू (Object) ज्यापासून बनलेली असते, त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य (Matter) असे म्हणतात. 

द्रव्याचे  गुणधर्म:

                            स्थायू, द्रव व वायू या अवस्थांमध्ये (States) असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच गुणधर्मांसाठी कारणीभूत असते. वस्तूंचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत गुणधर्म तसेच राहतात उदा. खडूचा पांढरा रंग, शाईचा निळा रंग, अत्तराचा सुवास हे गुणधर्म ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात त्या द्रव्याचेच असतात.

                            वस्तूंना वस्तुमान (Mass) असते, जे तराजूसारख्या साधनाने मोजता येते, तसेच वस्तू जागा (Space)व्यापतात. हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेली असते त्या द्रव्यामुळे वस्तूला प्राप्त होतात; म्हणजेच वस्तुमान व आकारमान (Volume) हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ (Substance) असे म्हटले जाते. जसे – सोने, हिरा, पाणी,

मूलद्रव्य (Element)

                            सर्वच  पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. पदार्थांचे लहान कण म्हणजे रेणू. ज्यापदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्ये (Elements) म्हणतात. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. मूलद्रव्यांचे लहानांत लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. अणू डोळ्यांनी दिसत नाहीत; परंतु कोट्यावधी अणू एकत्र आले, की त्यांचे आकारमान डोळ्यांना दिसण्याइतपत मोठे होते. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे असते.

                          आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. त्यापैकी 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात, तर उर्वरित मूलद्रव्ये ही मानवनिर्मित आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन,लोह, पारा, तांबे ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये (Natural elements) आहेत. संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला जात आहे.

डेमोक्रीटस

                          डेमोक्रीटसने मूलद्रव्याच्या लहान कणांना अणू असे नाव दिले, कारण ग्रीक भाषेत atomos म्हणजे अविभाज्य होय. त्यावरून atom असे नाव अणूला पडले. जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणू निर्माण करता येत नाहीत, त्यांचे लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाहीत, असा सिद्धान्त मांडला. तसेच काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्ये दर्शवली. 

                         उदाहरणार्थ,  तांबे, सल्फर, हायड्रोजन,

  रेणू

                          निसर्गात ऑक्सिजन वायुरूपात आढळतो. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्रअस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू (Molecules) स्वरूपात सापडतो. अणू जसे डोळ्यांनी दिसत नाहीत, तसेच रेणूही डोळ्यांनी दिसत नाहीत.

  संज्ञा

                           दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी संक्षिप्त नावांचा वापर करतो. मूलद्रव्ये दर्शवण्यासाठीसुद्धा अशीच पद्धत वापरली जाते. मूलद्रव्यांसाठी संज्ञा (Symbols) वापरण्याची पद्धत बोलिअस या शास्त्रज्ञाने सुरू केली. मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवतात.  जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावांमध्ये पहिले अक्षर सारखे असते, तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात. उदाहरणार्थ, कार्बनसाठी C तर क्लोरीनसाठी Cl.

                          सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू (Metal) व अधातू (Non-metal) या गटांत करतात.  

धातूंचे वर्धनीयता (Mallealibility), तन्यता (Ductility), विदयुतवाहकता, उष्णतावाहकता, घनता,चकाकी (Luster), नादमयता (Sonority) असे गुणधर्म असतात. 

                          हे गुणधर्म ज्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येत नाहीत त्या मूलद्रव्यांना अधातू असे म्हणतात.

उदाहरणार्थ, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. 

                         जी मूलद्रव्ये काही प्रमाणात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातुसदृश (Metalloids) म्हणतात. हा मूलद्रव्यांचा तिसरा गट आहे. 

उदाहरणार्थ, अर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनिअम इत्यादी.

                       एका परिक्षानळीत साखर घेऊन तिला उष्णता दिल्यास साखर वितळते व पाण्याची वाफ होऊन काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. हा काळ्या रंगाचा पदार्थ म्हणजे कार्बन होय. म्हणजेच साखर हा पदार्थ अनेक  मूलद्रव्यांपासून बनला आहे. कार्बन डायऑक्साइड या नावावरून हा पदार्थ किती व कोणत्या मूलद्रव्यांपासून बनला आहे ते लक्षात  येते. 

संयुग (Compound) 

                     दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग (Compound) होय.

  उदाहरणार्थ ; पाणी, कार्बन डायऑक्साइड ही  संयुगे  आहेत.

                    संयुगाच्या लहानांत लहान कणाला रेणू  म्हणतात.

रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, तरच तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग असते. पाणी

हे संयुग आहे. हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो.

मिश्रणे 

                     जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात मिसळली जातात.  तेव्हा  तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात.  

                      मिश्रणातील पदार्थावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात. मिश्रणातील असलेल्या मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे मूळगुणधर्म कायम राहतात.

उदाहरणार्थ . सरबत , हवा,  विनेगार,  मीठ व पाणी यांचे द्रावण 

Leave a Comment