Study from Home

मानवी शरीर – स्नायू

                आपल्या  हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा. काय लक्षात येते ? दंडाचा भाग तुम्हांला टणक जाणवतो. हा मांसल भाग म्हणजे स्नायू होय. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूंमुळे प्राप्त होते.

               स्नायू (Muscle) म्हणजे गरजेनुसार आकुंचन-शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट.

                स्नायू हाडांना स्नायुबंधांनी (Tendon) घट्ट जोडलेला असतो. स्नायू आकुंचन पावला, की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. पापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कुर्‍हाडीने  लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालींपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडतात. बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो.

                स्नायू हे शरीराच्या सर्व भागांत असतात. माणसाच्या शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंचीही वाढ होत असते. मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ, निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40 % वजन  स्नायूंचे असते. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालींमुळे दिसतात. आपले डोके, तोंड, नाक यांच्याभोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. छोट्या स्नायूंमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात.

आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू नसतात.

1. ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscle) :

हातांनी काम करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. अशा कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ, हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात.

2. अनैच्छिक स्नायू (Involuntary Muscle): 

श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंदियांची कामे जीवनावश्यक असतात पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठरावीक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या  मदतीने होत असतात.

स्नायूंचे प्रकार (Types of muscles)

1. अस्थी स्नायू (Skeletal muscles)

               या स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदा., हातांचे, पायांचे स्नायू. यांची हालचाल ऐच्छिक असते. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात.

2. हदयाचे स्नायू (Cardiac muscles)

                हे स्नायू हृदयाचे आकुंचन (Contraction) व शिथिलीकरण (Relaxation) घडवून आणतात. त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते. हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास ७० वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते.

3. मृदू स्नायू (Smooth muscles)

              शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये हे स्नायू आढळतात. उदाहरणार्थ, जठर, आतडे, रक्तवाहिन्या (Blood Vessels), गर्भाशय (Uterus) इत्यादींचे स्नायू. यांची हालचाल अनैच्छिक असते. हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळत होत असतात.

काही कृती 

1. मूठ न आवळता हात 180 अंशांत (सरळ) ठेवा.

2. 90 अंशांमध्ये कोपरातून दुमडा.

3. हाताची बोटे खांद्याला टेकवा.

               वरील तीनही कृती करताना हाताच्या कोणत्या भागातील स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते ?आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते, तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात.

              आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू (Biceps) व खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला त्रिशिरस्क स्नायू (Triceps) असे म्हणतात. शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण (Efficient) असणे आवश्यक आहे. स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असावेत. नियमित व्यायाम करावा. त्यामुळे स्नायू बळकट होतात. बसताना पाठ ताठ ठेवावी. पोक (Bent) काढून बसू नये. पोक काढून बसल्यास पाठीतील काही मणक्यांत हळूहळू बदल होतात. पाठीचे आणि खांद्यांचे स्नायू दुखू लागतात, तसेच पाठीच्या कण्याचे आजार संभवतात. व्यायाम करीत असतांना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते. त्यामुळे श्वासोच्छवास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषकतत्त्वांचा भरपूर पुरवठा होतो.

              स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला Myology असे म्हणतात. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म आकुंचन पावणे हा आहे. शरीरातील सर्वांत मोठा स्नायू मांडीमध्ये असतो, तर सर्वांत लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो.

Leave a Comment