Study from Home

भौतिक राशी (Physical Quantities )

 भौतिक राशी (Physical Quantities )

           दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थांचे मापन केले जाते. उदाहरणार्थ, फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान; शरीर, द्रवपदार्थ यांचे तापमान ; द्रव, स्थायू, वायू यांचे आकारमान; विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य  व एकक (Unit) यांचा वापर करतात.

           उदाहरणार्थ, स्वराली दररोज दोन किलोमीटर चालते, या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशींचे परिमाण स्पष्ट करताना दोन हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक वापरले आहे.

अदिश राशी (Scalar Quantity)

       केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ,वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर, 101 फॅरनहाइट ताप इत्यादी.

सदिश राशी (Vector Quantity)

            परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने व पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. 

             उदाहरणार्थ, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान.

वस्तुमान (Mass):

             पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात. पदार्थात नैसर्गिकपणे स्थितीबदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच जडत्व असते. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जेवढे  वस्तुमान जास्त तेवढे जडत्वही जास्त असते.

               वस्तुमान ही अदिश राशी (Scalar Quantity) आहे. जगात कोठेही गेले तरी ते बदलत नाही. मात्र वस्तुमान आणि वजन या दोन भिन्न राशी आहेत. वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात. दुकानदाराकडील दोन पारड्यांचा तराजू वापरून आपण दोन वस्तुमानांची तुलना करतो.

वजन (Weight) 

               ज्या वस्तू आपण ग्रॅम, किलोग्रॅममध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान आहे. या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. एखादया वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. म्हणून वजन ही सदिश (Vector)राशी आहे. ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते.

               आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्हीही ठिकाणी सारखेच असते.

                 वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान इत्यादी भौतिक राशींचे मोजमाप करत असताना एकाच एककाचा वापर करता येत नाही. दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो. भौतिक राशी या एकमेकांपासून भिन्नअसल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते, म्हणून वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार निरनिराळी एकके वापरतात.

प्रमाणित मापन 

           मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. या मापांना प्रमाणित एकके म्हणतात. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप करावे लागते. कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एकका मध्ये आपण करतो. 

            उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक सुनिश्चित केलेले आहे. त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे एक मीटर असे प्रमाण मांडले आहे. अशा प्रमाण एककाची आवश्यकता का बरे आहे?  समजा लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात हे एक मांडले. या एककाचा वापर करून दोन हात तीन हात अशाप्रकारे कापड मोजता येईल. मात्र असे केल्यावर प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी वेगवेगळी येईल. त्यामुळे लांबी मोजण्यासाठी हात हे प्रमाण एक होऊ शकत नाही. प्रमाणित मापनाचे महत्त्व यातून स्पष्ट होते.

प्रचलित मापन पद्धती:

1. एमकेएस (MKS) पद्धती – 

या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत मोजतात.

            एमकेएस या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन होते.

2. सीजीएस (CGS) पद्धती – 

या मापन पद्धतीत लांबी सेंटिमीटरमध्ये,वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदात मोजतात.

पायाभूत राशी (Fundamental Quantities) :

             अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाणठरवले तरी ते पुरेसे आहे. अशा राशींना ‘पायाभूत राशी’ व त्यांच्याप्रमाणास ‘पायाभूत प्रमाण’ म्हणतात. अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये.

एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती

              सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती System International (SI) सध्या जगभरात वापरली जाते. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धती असेही म्हणतात.यानुसार लांबी, वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे  दिली आहेत.

              राशी                  एकक                चिन्ह 

              लांबी                 मीटर                  m

               वस्तुमान           किलोग्रॅम            kg

               काळ                  सेकंद                  s

Leave a Comment