भारत प्राकृतिक रचना
भूस्वरूप यांचा विचार करून भारताचे हिमालयीन पर्वत-प्रदेश, गंगा- सतलज मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश असे चार प्रमुख प्राकृतिक विभाग पाडले जातात.
हिमालयीन पर्वत-प्रदेश
हिमालय हा तरुण ‘वली’ पर्वत आहे. सागरतळावरून उचलल्या गेलेल्या वळयांपासून निर्माण झाल्यामुळे यातील खडक प्रामुख्याने स्तरित व रूपांतरित स्वरूपाचे आहेत.
हिमालयाच्या प्रमुख रांगा वायव्येकडील पामीरच्या पठारापासून आग्नेयेकडील सरहद्द प्रदेशापर्यंत अशा २,४१४ कि. मी. लांबीच्या प्रदेशात पसरलल्या आहेत. माऊंटएव्हरेस्ट ८,८४८ मीटर, कांचन-गंगा ८,५९८ मीटर व धवलगिरी ८,१७२ मीटर यांसारखी उंच शिखरे या भागात आहेत.
हिमालय पर्वतरांगांमुळे मुख्य आशिया खंडापासून भारतीय उपखंड भौगोलिकदृष्ट्या वेगळे झाले आहे. हिमालयाच्या २,४८६ मीटर उंचीपासून ४,३७७ मीटर उंचीदरम्यानच्या भागात झोझीला, नथुला, रोहतांग व लापचा यांसारख्या काही खिंडी आहेत. त्यातून हिमालयाच्या अंतर्गत भागातील दुर्गम प्रदेशांशी संपर्क साधणे शक्य होते. हिवाळ्यात या खिंडी बंद होत असल्याने पर्वतांतर्गत अशा बऱ्याचश्या भागाचा इतर जगाशी असलेला संबंध तुटला जातो. हिमालयाच्या प्रमुख रांगा पूर्वेकडे ब्रह्मपुत्रेपासून पश्चिमेकडे सिंधुनदीपर्यंत पसरलेल्या आहेत.
मुख्य रांगांपासून वळयांच्या स्वरूपात काही उंच रांगा वेगळ्या झालेल्या दिसतात. हिमालयाचा फार मोठा परिसर उंच पर्वतरांगा व खोल दऱ्या यांनी व्यापलेला असून तीव्र उतारांचे पर्वतभाग व इंग्रजी व्ही (V) आकाराच्या दऱ्या ही या प्रदेशातील भू-वैशिष्ट्ये सांगता येतील.
हिमालयाच्या उंचीवरच्या काही भागात हिमनद्या असून या हिमनद्यांच्या कार्यामुळे इंग्रजी (U) आकाराच्या दऱ्या, गिरिशृंगे व हिमानी सरोवरे निर्माण झाली आहेत. हिमालय पर्वताच्या एकमेकीना समांतर असणाऱ्या चार प्रमुख रांगा स्पष्ट दिसून येतात. या प्रमुख रांगांच्या उपरांगा एकमेकीत मिसळून काही ठिकाणी क्लिष्ट अशी भूरचना निर्माण झाली आहेत
ट्रान्स हिमालयाज :
हा पर्वतभाग काही पर्वतरांगा व अतिउंचीवरील पठारी प्रदेश यांचा मिळून बनलेला आहे. याची सरासरी उंची ६,००० मीटर इतकी आहे. भारताच्या संदर्भात विचार करता हा भाग सर्वांत उत्तरेकडील अंतर्गत भाग गणला जातो. या प्रदेशाची रुंदी सरासरी ४० कि. मी. इतकी आहे. पामीर पठार हा उंचीवरील पठारीप्रदेश याच भागात येतो. पामीरचे पठार भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडाचा मध्य मानला जातो. या पठारीभागापासून पूर्वेस, आग्नेयेस, ईशान्येस व नैॠत्येस पर्वतरांगा पसरलेल्या आहेत.
काराकोरम व कुनलुन या पर्वतरांगा हा पठारी भाग छेदून जातात. हाच पर्वतभाग उत्तरेकडे झास्कर रांग म्हणून ओळखला जातो. ‘K-2 ‘ किंवा ‘गॉडविन ऑस्टीन 8611. मीटर है काराकोरम, रांगांतील सर्वोच्च पर्वतशिखर होय. हे शिखर भारतातील सर्वोच्च, जगातील क्रमांक दोनचे उच्च शिखर म्हणून गणले जाते.
ट्रान्स हिमालयीन पर्वत प्रदेशात ईशान्य काश्मीरमध्ये लडाखचा पठारी प्रदेश येतो. लडाखच्या पठाराची सरासरी उंदी ५,३०० मीटर असून वास्तविक पाहाता त्यामध्ये तुटक स्वरूपाच्या अनेक पठारी प्रदेशांचा (जसे- लिंग-झी-तांग मैदान, अक्साई चीन आणि सौदा मैदान) यांचा अंतर्भाव होतो.
(२) ग्रेटर हिमालयाज :
हा प्रदेश ‘हिमाद्री‘ म्हणून ओळखला जातो. इतर रांगांच्या तुलनेत हा सर्वांत सलग व उंच पर्वतप्रदेश आहे. याचा वायव्येकडील भाग नंगा पर्वत (८,१२६ मीटर) म्हणून ओळखला जातो. पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशात हा भाग नामचा बरवा (७,७५६ मीटर) म्हणून संबोधला जातो. ग्रेटर हिमालयाची सरासरी उंची ६,१००मीटर असली तरी ८,००० मीटरहून अधिक उंचीची अनेक पर्वतशिखरे यात आहेत.माऊंट एव्हरेस्ट (८,८४८ मीटर) या जगातील सर्वोच्च शिखराबरोबरच कांचनगंगा (८,५९८ मीटर), नंदादेवी (७,८१७ मीटर) ही उंच शिखरे ग्रेटर हिमालयीन रांगांत मोडतात. हा पर्वतभाग बाराही महिने हिमाच्छादितच असतो. काश्मीर परिसरात या रांगांमध्ये २,४४० मीटर उंचीपर्यंत, तर मध्य भागात ३,९६० मीटर उंचीपर्यंत खाली येणार्या हिमनद्या आहेत.
(३) लेसर हिमालयाज :
हा भाग ‘हिमाचल’ म्हणूनही ओळखला जातो. या पर्वतप्रदेशाची रुंदी ६४ ते ८० कि. मी. असून सरासरी उंची ३,००० मीटर इतकी आहे. असे जरी असले तरी ५,००० मीटरपेक्षा अधिक उंचीचीही काही पर्वतशिखरे या रांगांमध्ये आहेत. लेसर हिमालयीन रांगेचा दक्षिणाभिमुख उतार तीव्र असून उत्तराभिमुख उतार तुलनेने द स्वरूपाचा व घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या रांगांमध्ये १.५०० ते १,६०० मीटर उंचीवर ओक वृक्षांची जंगले; १,६०० ते २,१०० मीटर उंचीच्या दरम्यान चीर,देवदार, ब्ल्यू-पाइन या वृक्षांची जंगले तर २,४०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर बर्च, स्मूस सिल्व्हर फर या वृक्षांची जंगले आदळतात. काश्मीरमधील ‘पीर पांजाल’ ही लेसर हिमालयातील सर्वाधिक लांबीची पर्वतरांग असून ही रांग झेलम व बियास या नद्याचा दरम्यान येते. आग्नेयेकडे धोलाधार नावाने ओळखली जाणारी रांगही लेसर हिमालयाचा एक भाग असून सिमला (२,२०५ मीटर) हे थंड हवेचे ठिकाण याच रांगेत येते. १५० कि. मी. लांबीचे व ८० कि. मी. रुंदीचे जगपसिद्ध काश्मीर खोरेही लेसर हिमालयातय समुद्रसपाटीपासून १,७०० मीटर उंचीवर वसले आहे. या खोऱ्यातुन झेलम नदी वाहते