बोधकथा – मृगजळ – Moral Story
आकाशातील ढगाचा हेवा वाटून त्याच्या प्राप्तीसाठी एका चिमणीने उड्डाण केले. ती वर वर जाऊ लागली. ती ढगाजवळ पोहोचणार, इतक्यात ढगाने आपली दिशा बदलली. चिमणी त्याच्याकडे जाऊ लागली. ती जवळ येताच ढग अंतर्धान पावला. त्याच्या शोधात चिमणी पुन्हा भटकू लागली. खूप दूरवर तिला तो ढग दिसला. त्याचे वेगवेगळे भाग पडले होते. कोणता भाग पकडावा या विचारात ती भटकू लागली.
इतका वेळ उडत राहिल्याने तिचे शरीर थकले. तरीही ती प्रयत्न सोडत नव्हती. ढग मिळविण्यासाठीचा तिचा लोभ मात्र काही केल्या सुटत नव्हता.निकराचा प्रयत्न करून तिने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ढगच विरून गेला आणि तिच्या हाती काहीही लागले नाही.
या धावपळीमुळे तिची दमछाक झाली आणि ती जमिनीवर कोसळली. कोसळल्यावर म्हणाली, मी या ढगाच्या मागे लागूनमाझे आयुष्य संपवले. मला कसे कळले नाही की ढगाच्या मागे लागले म्हणजे मृगजळाच्यामागे धावण्यासारखा प्रकार आहे.
तात्पर्य : मृगजळामागे धावणाऱ्याच्या हाती काहीही लागत नाही.