बोधकथा – जीवनमूल्ये – Moral Story
एका दरिद्री मजुराला रस्त्यावर खोदकाम करत असता एक सुंदर शिल्प सापडले. घडीव दगडात कोरलेली ती सुंदर मूर्ती पाहून त्याला गावातील प्राचीन मूर्त्यांचा संग्रह करणाऱ्या बंडोपंतांची आठवण झाली. त्याने विचार केला की, त्यांना प्राचीन मूर्त्यां जमविण्याचा छंद आहे. ही मूर्ती जर मी त्यांना देऊन टाकली तर मला याची बरीच किंमत मिळेल.
चला आजचा दिवस भाग्याचा आहे. बंडोपंतांची आर्थिक स्थितीही उत्तम होती. त्या मजुराने ती मूर्ती त्यांना दिली. बंडोपंतांनी त्याला थोडे पैसे दिले. ते पैसे घेऊन तो घरी गेला. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, छंद इतका वेडा असू शकतो, हे मला माहीतच नाही. इतकी जुनी मूर्ती; पण या बंडोपंतांनी केवढे पैसे दिले त्याचे!
चला आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब. इकडे बंडोपंतांनी मूर्ती स्वच्छ केली. ते मनात विचार करू लागले. बरीच वर्षे मूर्ती जमिनीत पडली होती. याची किंमत लाखांच्या घरात होती. या वेड्याने काही लाखांची दुर्मिळ मूर्ती मला कवडीमोल किंमतीत दिली. मूर्ख लेकाचा. जीवनातही असेच असते. जीवनमूल्यांची किंमतही अशीच बदलत असते. काही अनमोल गोष्टी आपण कवडीमोलाच्या ठरवतो. त्याचे मोल आपल्याला नसते.
तात्पर्य : जीवनमूल्यांची किंमतही अशीच परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार बदलते.