बौद्ध धर्म : गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३)
बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ, त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना ‘बुद्ध’ असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे, हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या ऊरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्या वेळेस त्यांना ‘बोधि’ प्राप्त झाली.
बोधि म्हणजे सर्वोच्च ज्ञान’. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता ‘बोधिवृक्ष‘ असे म्हणतात. तसेच ‘ऊरुवेला’ या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला, त्यास ‘धम्म’ असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्रालागती दिली म्हणून या घटनेला ‘धम्मचक्कपवत्तन‘ असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली चारिका म्हणजे पायी फिरणे त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेस ‘त्रिशरण’ असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढीलप्रमाणे आहे.
आर्यसत्ये : मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत. त्यांना आर्यसत्ये म्हटलेले आहे.
१. दुःख : मानवी जीवनात दुःख असते.
२. दु:खाचे कारण : टुखाला कारण असते.
३. दुःख-निवारण दुःख दूर करता येते.
४. प्रतिपद : प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गास ‘अष्टांगिक मार्ग’ असे म्हटले आहे.
पंचशील गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांना ‘पंचशील ‘ असे म्हणतात.
१. प्राण्यांची हत्या करण्याच्या कृतीपासून दूर राहणे.
२. चोरी करण्यापासून दूर राहणे.
३. अनैतिक आचरणापासून दूर राहणे.
४. असत्य बोलण्यापासून दूर राहणे.
५. मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे.
बौद्ध संघ:
आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाच्या त्यांच्या अनुयायांना ‘भिक्खू’ असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णांतील व जातींमधील लोकांना प्रवेश होता.
अष्टांगिक मार्ग
१. सम्यक् दृष्टी : चार आर्यसत्यांचे ज्ञान होय.
२. सम्यक् संकल्प : हिंसा वगैरे तत्त्वांचा त्याग होय.
३. सम्यक् वाचा : असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे.
४. सम्यक् कर्मान्त : प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.
५. सम्यक् आजीव : उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे.
६. सम्यक् व्यायाम : व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत; उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा; चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत; तसेच, उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणे.
७. सम्यक् स्मृती : मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरैंना योग्य रीतीने समजून घेणे.
८. सम्यक् समाधी : चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे.
उपदेशाचे सार :
गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. ‘छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते’ हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयींचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांच्याप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा,शील, इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणिमात्रांविषयी ‘करुणा’ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे.