Study from Home

ओळख शास्त्रज्ञांची – चरक

ओळख शास्त्रज्ञांची –  चरक

आयुर्वेदाचार्यांसाठी चरक संहिता

चरक

आयुर्वेदातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे ‘चरक संहिता.’ हा चरक कोण कुठला हे प्रश्न आपोआपच पुढे येतात. चरक हा इसवी सन पूर्व ५०० च्या आसपास होऊन गेला. त्याचा निश्चित जीवनकाळ माहित नाही. तो पंजाबातला असावा. त्याच्या घराण्याविषयीही काही माहिती उपलब्ध नाही. फार काय, त्याच्या नावाविषयीही एक कथा सांगितली जाते. विष्णुचा नाग म्हणजे शेष याने ऋषीपूत्र म्हणून जन्म घेतला. तो शेष म्हणजे त्याला सर्व वेद येत होते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा भाग, तोही त्याला येत होता. तो मग घरोघरी, गावोगावी फिरून लोकांना आयुर्वेदाविषयी सांगत असे. जो फिरत असतो तो ‘चर’ म्हणून त्याचं नाव पडलं ‘चरक’. या कथेची सत्यता कितपत होती हे पाहाण्यापेक्षा चरक संहितेच्या ग्रंथकाराचं नाव काही सांगता येत नाही, हे मान्य केलेले बरे.


चरक संहिता लिहिण्यापूर्वी चरकाने मानव शरीराचा सखोल अभ्यास केला होता. माणसाच्या शरीरात ३६० लहान मोठी हाडे असतात हे त्याने संशोधन करून सांगितले होते. चरकाचा समकालीन याज्ञवल्क्य याचेही तेच मत होते. शरीराच्या अवयवांचा अभ्यास केल्यावर त्याने त्याचे सोईसाठी आठ भागात विवेचन केले आहे. रोगाची उत्पत्ती अन त्याचे निराकरण याविषयी त्याने आपल्या ग्रंथात उल्लेख केला आहे. सर्दी पडसे, खोकला यासारख्या नेहमी होणाऱ्या आजारापासून महाभयंकर रोगांपर्यंत या ग्रंथात विवेचन दिलेले आहे. कोणत्या रोगावर कोणती औषधयोजना करावी हे देखील सांगितले आहे.


आयुर्वेदानुसार औषध देणाऱ्यांना वैद्य म्हणतात. या सर्व वैद्यांनी व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या भावी आयुष्याविषयी एक शपथ घ्यायची असते ती देखील या ग्रंथात दिलेली आहे. ही शपथ म्हणजे वैद्यांनी पाळावयाची आचारसंहिताच आहे. ‘मी आजन्म ब्रह्मचारी राहिन, साधं जेवण घेत जाईन, कुणाशीही वैर धरणार नाही, कुणाचाही द्वेष करणार नाही, कुणाही रुग्णाची अवहेलना करणार नाही, रूग्णाला त्याच्या घरी जाऊन तपासून औषध देईन, हे कार्य करत असताना रुग्णांच्या घरची एकही खाजगी गोष्ट बाहेर सांगणार नाही, गर्व किंवा घमेंड यापासून दूर राहीन, गुरुजनांना पूज्य मानून कार्य करीन.’ या सारख्या प्रतिज्ञा केल्यावरच त्याने आयुर्वेदाचा अवलंब करून औषधे द्यायची आहेत. 


वैद्याचं कार्य थोडक्यात समाजाची सेवा करण्याचं आहे. चरक संहितेमध्ये मानवी शरीराची माहिती विस्ताराने दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोणता रोग कसा होतो व त्यावर उपाययोजना कोणती करावी हेही सांगितलेले आहे. या औषधांमध्ये वनस्पती, कंदमुळं इत्यादींचा वापर करत असतात. त्याचीही माहिती दिलेली आहे.


सुमारे तीन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेला चरक, त्याने सांगितलेले माणसाचे आजार, निरनिराळ्या व्याधी, त्यांच्यावरील उपाययोजना हे आजदेखील उपयुक्त ठरतेय यावरून ते लिहून ठेवणाऱ्याने किती बारकाईने अभ्यास करून सारं काही सांगितलंय याची जाणीव होते. त्याकरिता किती वर्ष अभ्यास केला असावा याचीही कल्पना येते. आयुर्वेदाचा अवलंब करून रुग्णांची सेवा करणारे आजही चरकाला पूज्य मानतात.


चरक नंतर आयुर्वेदाच्या क्षेत्रात भरद्वाज आणि त्याचा शिष्य पुनर्वसु आत्रेय यांनीही खूप कार्य केलंय. चरक संहिते प्रमाणे ‘आत्रेय संहिता’ ही देखील प्रख्यात आहे.

Leave a Comment