नैसर्गिक संसाधन – हवा
पृथ्वीची शिलावरण जलावरण व वातावरण ही तीन आवरणे आहेत. त्यापैकी वातावरण हे महत्त्वाचे आवरण आहे. वातावरणातील हवेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साइड, निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साईड ,सल्फर डाय ऑक्साईड ,पाण्याची वाफ ,धूलिकण यांचा समावेश असतो.
वातावरणाचे पुढीलप्रमाणे पाच थर असतात. तपांबर ,स्थितांबर ,दलांबर ,आयनांबर आणि बाह्यांबर. तपांबर यामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे ८० % वायू असतात. स्थितांबरात हे प्रमाण १९ % असते. दलांबर व आयनांबर यामध्ये नगण्य वायू आढळतात. बाह्मयांबराध्ये वायू आढळत नाहीत. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त असते व जसजसे भूपृष्ठापासून वर जावे तसतसे कमी होत जाते. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण ७८ %असते. ऑक्सिजनचे प्रमाण २१ %असते. कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.०३ %असते. अरगॉनचे प्रमाण ०.९ % असते. इतर वायू, बाष्प, धूलिकण यांचे प्रमाण ०.०७ % असते.
वायूंचे विविध उपयोग
हवेमध्ये असणाऱ्या नायट्रोजन चा उपयोग सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास होतो.अमोनिया वायू निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन चा उपयोग होतो. ऑक्सीजन वायूचा उपयोग सर्व सजीवांना श्वसनासाठी होतो तसेच ज्वलनासाठी ऑक्सिजन उपयोगी आहे. कार्बन डाय-ऑक्साइड वायू चा उपयोग करून वनस्पती अन्न तयार करतात तसेच कार्बन डाय ऑक्साइड चा उपयोग अग्निशामक म्हणून सुद्धा करतात.
हेलियम वायू चा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये होतो . आरगॉन या वायूचा उपयोग विजेच्या बल्ब मध्ये होतो. निऑन वायु चा उपयोग स्ट्रीट लॅम्प मध्ये केला जातो . क्रिप्टॉन वायूचा उपयोग फ्लोरोसेंट पाईप मध्ये केला जातो . झेनॉन वायूचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफी मध्ये केला जातो.
हवेचे प्रदूषण
रस्त्यावर चालणारी वाहने, मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे, लाकूड कोळसा यांचे ज्वलन यातून बाहेर पडणारा धूर व घातक वायू या सर्वांमुळे हवेचे प्रदूषण होत असते. दिल्ली पंजाब हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये शेतात कापणीनंतर उरणारा कचरा जाळला जातो त्यामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. इंधनाच्या ज्वलनातून नायट्रोजन डायॉक्साईड, कार्बन डायॉक्साईड ,कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड तसेच काजळी यासारखे घातक पदार्थ हवेत सोडले जातात. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरांमध्ये हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर दिसून येते तसेच ज्या ठिकाणी कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत आणि कारखान्यांचे प्रदूषण यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नाही त्या ठिकाणी प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात दिसून येते.
हवेच्या प्रदूषणाचे अत्यंत घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात श्वसनाचे विविध आजार डोकेदुखी डोळ्यांचे विकार तसेच कॅन्सर सारखे भयंकर आजारही हवेच्या प्रदूषणामुळे आपल्यावर ओढवतात. हवेच्या प्रदूषणाचे केवळ मानवावर परिणाम होतात असे नाही तर वनस्पती आणि इतर प्राण्यांवर देखील अत्यंत घातक परिणाम होत असतात.
प्रदूषण नियंत्रण
सर्व कारखान्यांमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. एखाद्या शहरामध्ये सर्वात जास्त प्रदूषण कारखान्यांद्वारे होत असते त्यामुळे प्रत्येक कारखान्याची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सतत कार्यरत आहे की नाही हे वेळोवेळी तपासले जाणे आवश्यक आहे. घातक धूर सोडणारी वाहने रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. इंधन म्हणून लाकूड गोवऱ्या कोळसा यांचा वापर न करता एलपीजी चा वापर जास्तीत जास्त वाढवणे आवश्यक आहे. घरातील कचरा तसेच शेतातील कचरा जाळला न जाता त्याचे कंपोस्ट कसे तयार होईल त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
ओझोन संरक्षक कवच
पृथ्वीच्या वातावरणामध्ये ओझोन वायूचा थर हा पृथ्वीवरील सजीवांसाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे हे सजीवांसाठी अत्यंत हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे संरक्षण होते. वातावरणाच्या स्थितांबर या थराखाली ओझोन वायूचा थर आढळतो. क्लोरोफ्ल्युरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड हे वायू वातानुकूलन यंत्रे व रेफ्रिजरेटर यामध्ये वापरले जातात या वायूंमुळे ओझोनच्या थराची हानी होते. त्यामुळे ओझोनचे महत्व सर्वांना लक्षात येणे आवश्यक आहे. म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस सर्व जगात ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांचा समतोल असणे आवश्यक आहे. प्रदूषणामुळे हा समतोल बिघडतो म्हणून आपण सर्वांनी हवेचे प्रदूषण होणार नाही यासाठी प्रयत्न करू या.