Study from Home

ओळख शास्त्रज्ञांची- बेंझामिन फ्रँकलिन

वीजवाहक उपकरण- बेंझामिन फ्रँकलिन

पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमा होतात. मोट्ठा आवाज होतो. कडकडाट होतो, वीजेचा लखलखाट होतो. ‘म्हातारी दळतेय’ म्हणून त्या कडकडाटाला म्हटलं जाते. आकाशात म्हातारी नसते, मात्र जी काही आवाज करते ती असते वीज. ढग एकमेकांवरआदळतात. त्यांच्या घर्षणामुळे वीज चमकते. वीजेचा गोळा तयार होतो आणि तो जमिनीकडे खूप जोरात झेपावतो. जमिनीत गेल्या खेरीज वीजेच्या गोळ्याचा वेग व हानी पोहोचवण्याची शक्ती नष्ट होत नाही. ज्या काही उंच इमारती असतात त्यांना या वीजेपासून फार मोठा धोका असतो. तसं पाहिलं तर सर्वच इमारतींना, झाडांखाली उभे राहाणान्यांना, रस्त्याने जा ये करणाऱ्यांना या वीजेपासून भीती असते. इमारतीवर ही वीज पडली तर इमारत कोसळते, भंगते. झाडं तर ही वीज स्वतःकडे खेचून घेतात. अशावेळी झाडाखाली उभे असणारे या वीजेमुळे प्राणास मुकतात. ढग येणारच, पाऊस पडणारच, वीज पडणारच, मग तिच्या पासून संरक्षण कसं करायचं?


उंच इमारतींवर एक त्रिशूळ उभा पाहिला असेल. या त्रिशूळाला एक तांब्याची पट्टी असते. तिचे एक टोक त्रिशूळात असतं तर दुसरं टोक खाली जमिनीत गाडलेलं असतं. ही तांब्याची पट्टी बरीच लांब असते. जर यदा कदाचित त्या इमारतीवर वीज पडली तर ती या त्रिशूळाकृतीकडे आकृष्ट होते आणि तांब्याच्या पट्टीद्वारे जमिनीकडेनेली जाते. जमिनीत गेल्यावर त्या वीजेचा वेग कमी होतो.
तिच्यापासून हानी पोहोचत नाही. या त्रिशूळाला लायटनिंग कंडक्टर म्हणतात अन त्याचा शोध लावलाय बेंझामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने.

हा शोध लावण्यापूर्वी त्याने जो प्रयोग केला तो मोठा मजेशीर होता. पावसाळ्याचे दिवस होते. फ्रँकलिननी एक पतंग तयार केला. त्यासाठी त्याने रेशमी कापड वापरले. दोराही थोडा जाडा अन रेशमी घेतला. पतंगाला लावलेल्या काड्यांना एक धातूची तार लावली, पतंग हवेत उडवला, पतंग उंच आकाशातील ढगात गेला. हातातील दोऱ्याच्या टोकाला एक धातूची चावी लावली. मात्र ती हाताच्या बोटांपासून थोडी दूर ठेवली. ढग गडगडले, वीज चमकली ती त्या पतंगाच्या तारेमुळे, रेशमी धाग्यामुळे जमिनीकडे सरकली. फ्रँकलिनने दोरीच्या टोकाजवळ बांधलेल्या चावीला अलगद स्पर्श केला. त्यावेळी असंख्य ठिणग्या उडाल्या, वीज त्या चावीपर्यंत येऊन पोहोचली होती.ढगांतली वीज खाली आली होती. या प्रयोगातून वीजवाहक उपकरणाचा लाइटनिंग कंडक्टरचा जन्म झाला.

वीज पडली म्हणून होणारी हानी त्यामुळे टळू लागली. बंझामिन फ्रँकलिन हा शास्त्रज्ञ होता तसाच राजनीतिज्ञ, अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात त्याने भाग घेतला होता.

त्याचा १७ जानेवारी १७०६ रोजी जन्म अमेरिकेत झाला, १७ एप्रिल १७९० रोजी मृत्यु पावला. त्याने अनेक शोध लावले. त्यापैकी डोळ्याला लावला जाणारा बायफोकल काचांचा चष्मा हाही एक!