Study from Home

ओळख शास्त्रज्ञांची- दुर्बिणीचा जनक गॅलिलियो

दुर्बिणीचा जनक गॅलिलियो


क्रिकेटची मॅच होती. एकाने सोबत दुर्बिण आणली होती. गळ्यात दुर्बिणीचा पट्टा अडकवून तो सारे मैदान पहात होता.
मुलांना त्या दुर्बिणीतून कसं दिसतं हे पहाण्याची मोठी हौस होती. मग आळीपाळीने मुलांनी दुर्बिणीतून पाहिलं. किती जवळ दिसत
होते स्टम्प, सारे मैदान लहान वाटत होते. जेथे दुर्बिण फिरवली तो भाग खूप जवळ वाटायचा. या दुर्बिणीचा शोध लावलाय चारशे
वर्षापूर्वी, इटलीतील गॅलिलियो या शास्त्रज्ञाने. दुर्बिण पाहून मुलांची जी अवस्था झाली तीच अवस्था लहान थोरांची झाली होती दुर्बिणीचा
शोध लागला त्यावेळी. दुर्बिण घेऊन दरबारात येण्यासाठी गॅलिलीयोला राजाने फर्माविले. सगळ्यांनी दुर्बिणीतून पाहिलं. चकीत झाले
सगळे! काहीजण तर दुर्बिण घेऊन चर्चच्या उंच मनोऱ्यावर चढले. त्यांना बंदरात उभी असलेली जहाजं अगदी जवळ उभी असल्याचं
वाटू लागलं.गॅलिलीयोने दुर्बिणीच्या मदतीने मग आकाशातील ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला. चंद्रावर त्याने दुर्बिण रोखली, गुरुवर त्याने काय आहे हे पाहिलं. त्याच्या उपग्रहांचं दर्शन त्याला झालं.

गुरुत्वाकर्षणाचे पूर्वापार चालत आलेले विचार गॅलिलीयोनी खोडून काढले. कोणतीही वस्तू, मग ती कितीही वजनाची असो,
समान गतीने जमिनीकडे आकृष्ट होते, असं त्याने मांडलं, व ते सिद्धही करून दाखवलं. त्याकरिता त्याने दोन लोखंडाचे गोळे तयार
केले, एक शंभर पौंड वजनाचा तर दुसरा फक्त एक पौंड वजनाचा.हे दोन्ही गोळे घेऊन तो पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावर चढला. त्याचा
हा प्रयोग पाहण्यासाठी असंख्य लोक मनोयाभोवती खाली जमा झाले. गॅलिलीयोने ते दोन्ही गोळे वरून एकाच वेळी खाली ढकलले.
ते एकाच वेळी जमिनीवर येऊन पडलेही. त्याच्या या प्रयोगामुळे परंपरावादी लोक चांगलेच भडकले. ते गॅलिलीयो विषयी वाईट बोलू
लागले.

घड्याळातील लंबकाचा शोधही गॅलिलीयोचाच. एकदा चर्चमधे तो सायंकाळी गेला होता. त्यावेळी तेथे छताला लटकणाऱ्या
दिव्याला नोकराने पेटवलं. त्या काळी वीज नव्हती. हे करत असताना दिव्याला धक्का बसला. तो हेलकावे खाऊ लागला. किती सामान्य
घटना ही! पण गॅलिलीयोने विचार केला, इकडून तिकडे अन तिकडून इकडे येण्यासाठी दिव्याला किती वेळ लागतो? हे मोजण्यासाठी
त्याच्या जवळ आजच्या सारखे घड्याळ थोडंच होतं. मग त्याने डाव्या हाताच्या नाडीवर उजव्या हाताची बोटं ठेवली. त्या ठोक्यांमधे दिव्याला हिंदळण्यासाठी लागणारा वेळ त्याने मोजला. हे हिंदळणे लहान असो की मोठं असो, त्याला सारखाच वेळ लागतो हे त्याने सिद्ध केले. या विचारातून घड्याळाच्या लंबकाचा शोध लागला.

मात्र म्हातारपणी या शास्त्रज्ञाला मानसन्मान मिळण्याऐवजी कारावास भोगावा लागला. पूर्वापार विचाराप्रमाणे पृथ्वीभोवती सूर्य, चंद्र व इतर ग्रह तारे फिरत असतात असे होते. मात्र गॅलिलीयोने त्याच्या उलट म्हणजे पृथ्वीच सूर्याभोवती फिरत असते, असं दाखवून दिलं. समाजातील काही जणांनी राजाकडे तक्रार केली. लोकांचे पूर्वापार चालत आलेले विचार असत्य होते तरीही राजाने गॅलिलीयोला तुरुंगात टाकले. त्याची काही दिवसानंतर सुटका झाली ही गोष्ट वेगळी. तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला कमी कमी दिसू लागलं होतं. तो पुढे आंधळाही झाला होता.

१५ फेब्रुवारी १५६४ रोजी इटलीत जन्मलेला हा थोर शास्त्रज्ञ ८ जानेवारी १६४२ रोजी मरण
पावला.