Study from Home

मृदासंवर्धन

 मृदा

मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे रंग होय. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजे मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते. मृदा वेगवेगळ्या रंगांची असते. जसे-काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी. रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरिता उपयोगी पडतात. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस/ सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता यांबाबत स्पष्टता येते. मृदेचा रंग तिच्या पोतावर , जैवघटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक  घटकांवर अवलंबून असतो.

मृदेचा पोत

मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार पडतात.

रेताड मृदा :    रेताड मृदेत वाळूचे , मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते. यातून पाण्याचा जलद निचरा होतो. अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साइड(क्वार्ट्झ) या खनिजाचे बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते.

पोयटा मृदा:  पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. पोयटा मृदायुक्त जमिनी रेताड जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात, परंतु चिकणमातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही जात नाहीत. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. या मृदेची अन्यद्रव्ये पुरवण्याचीक्षमता खूप जास्त असते. या मृदेला ‘गाळाची मृदा’  असेही म्हणतात.

चिकण मृदा:  या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाणसर्वाधिक असते. चिकणमातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात.

मृदेची रचना

मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय ,कणस्वरूप ,स्तंभाकार  व ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदेची रचना आढळून येते.

मृदारचनेचे महत्त्व: 

मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदारचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात.

1. मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो.

2. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या  मुळांची चांगली वाढ होते.

मृदेचे उपयोग 

1. वनस्पती संवर्धन : वनस्पतींची वाढ करणे.

2. जलसंधारण : मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळी या माध्यमांतून पाण्याचा आपल्याला बाराही महिने उपयोग करता येतो.

3. आकार्यता : मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ, माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.

उपयुक्त मृदेचे काही प्रकार

1. चिनी मृदा  : ही पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून कपबश्या, स्नानगृहातील फरश्या, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवतात.

2. शाडूची मृदा : ही पांढरट रंगाची असून पुतळे, मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते.

3. टेराकोटा मृदा : या मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात.

4. मुलतानी मृदा : ही मृदा सौंदर्यप्रसाधनांत वापरली जाते.

                    चिनी माती हे केओलिनाइट या प्रकारचे एक औदयोगिक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडते म्हणून याला चिनी माती म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी, तसेच काठिण्य प्राप्त होते, म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी करतात.

मृदा परिक्षण

                         मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रीय पदार्थांचे  प्रमाण मृदापरीक्षणामध्ये तपासले जाते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदापरीक्षण केले जाते.

                 मृदापरीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना ते दहा दिवस मोकळ्या ठिकाणी सावलीत सुकवावा. नंतर चाळणीतून चाळून घ्यावा. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी,

1. pH (सामू) आणि   2.  विद्युतवाहकता (ElectricalConductivity)     या दोन परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. विविध प्रयोगांच्या आधारे आपल्या शेतातील मृदेची सुपीकता  तुम्हांला ठरवता येते. 

                           डेन्मार्कचे शास्त्रज्ञ सोरेन्सन यांनी हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना मांडली. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे तीन प्रकार आढळतात.

1. आम्लयुक्त मृदा – pH 6.5 पेक्षा कमी

2. उदासीन मृदा – pH 6.5 ते 7.5

3. आम्लारीधर्मी मृदा – pH 7.5 पेक्षा जास्त.

मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे

1. मृदेचा सामू (pH) 6 पेक्षा कमी / 8 पेक्षा जास्त.

2, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी.

3. जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे.

4. सतत एकच पीक घेणे.

5. रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत  बिघडतोआणि ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही.

                           जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी. उदाहरणार्थ, गव्हाचे पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यांसारखी पिके घ्यावी. यामुळे जमिनीचा कमी झालेला कस  भरून निघतो.

मृदासंवर्धन

 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा  दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांनी मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Leave a Comment