Study from Home

भौतिक बदल व रासायनिक बदल

                      

                   झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे यांचे दोन गटांत वर्गीकरण करताना तुम्ही कोणत्या बाबी विचारात घ्याल ?  या  बदलांमध्ये कोणते बदल हे आपोआप किंवा नैसर्गिकरीत्या घडून आले आहेत?

                  फळ पिकणे, दूध ,नासणे हे बदल निसर्गत: च घडून येतात.  म्हणून त्यांना नैसर्गिक बदल (Natural change) असे म्हणतात.  दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक मानवनिर्मित पदार्थ पाहतो, ते विविध प्रकारे उपयोगात आणले जातात. पेन्सिलीला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून त्यांना उपयुक्त (Useful) बदल म्हणतात, तर उपयुक्त नसणाऱ्या  किंवा मानवास हानी पोहचवणा-या बदलांना हानिकारक (Harmful) बदलम्हणतात. वादळात उन्मळून पडलेले झाड हा  हानिकारक  प्रकारचा बदल आहे तर दुधाचे दही होणे हा उपयुक्त  प्रकारचा बदल आहे.

                           आपण अभ्यासलेल्या निसर्गनिर्मित व मानवनिर्मित बदलांचे उपयुक्त व हानिकारक बदल असे वर्गिकरण करता येऊ शकते. आपण बदलांचे काही प्रकार अभ्यासले आहेत. त्यांपैकी फुगा फुटणे व फळ पिकणे बदलांचा कालावधीच्या दृष्टीने विचार केला, तर आपल्याला  सांगता येईल की फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी आहे. जे बदल घडून  येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र (Quick) होणारे बदल म्हणतात. तर फळ पिकणे हा सावकाश (Slow) होणारा बदल आहे. आपल्या सभोवताली होणारे शिघ्र व सावकाश बदल यांचे आपण  निरीक्षण करू शकतो.

                  काचेच्या तुकड्यांपासून तुम्ही गोलाकार कडे बनवले. त्याचा आकार बदलून पूर्वीसारखाच तुकडा कसा बनवता येईल ?   मेणबत्ती वितळवून पुन्हा मेणबत्ती कशी तयार करता येईल ?

                 मेण वितळवून पुन्हा मेण मिळवणे, हे आपण पुन्हा पुन्हा करून पाहू शकतो. म्हणून पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाच्या बदलांना परिवर्तनीय बदल (Reversible) म्हणतात, परंतु पिकलेल्या आंब्याचे पुन्हा कैरीत रूपांतर होत नाही. लाकूड जाळले की राखेपासून पुन्हा लाकूड मिळत नाही. अशाप्रकारच्या बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात

                  दिवसानंतर कोणती स्थिती येते ? किंवा  सूर्योदयानंतरची दुसरी स्थिती कोणती?  समुद्राच्या भरतीनंतर काय स्थिती येते?

                 झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे, पूर येणे, आकाशातून उल्का पडणे.

वरील उदाहरणांचा विचार करता काही बदल हे ठरावीक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना आवर्ती (Periodic) बदल म्हणतात.  याउलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही, आणि तो झालाच तर त्या दोन्हींमधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावर्ती (Non-periodic) बदल म्हणतात.

           उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतुबदल कोणता बदल आहे ?  घड्याळात सकाळी सहा वाजल्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यांमध्ये दिसून येतो? 

वरील काही बदलांच्या उदाहरणांचा विचार केला, तर काही बदल घडताना मूळ पदार्थांचे (Original matter) गुणधर्म आहे तसेच राहिले. म्हणजेच त्यांचे संघटन कायम राहिले. कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. अशा प्रकारच्या  बदलास भौतिक बदल (Physical change) असे म्हणतात.

                  जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांत होते अशा बदलास रासायनिक बदल (Chemicalchange) असे म्हणतात.

विविध रासायनिक व भौतिक बदल

                      द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन (Evaporation). कपडे वाळणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे हे बाष्पीभवनाने शक्य होते. जलचक्रामध्ये आपण विविध क्रिया अभ्यासू शकतो त्या क्रिया होत असताना पाण्याचे मूळ गुणधर्म बदलत नाहीत. विरघळणे (Dissolving), उत्कलन (Boiling), विलयन (Melting)  या सर्व क्रिया ही भौतिक बदलांची उदाहरणे आहेत.

                     लाकूड जाळणे, दूध नासणे, टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे ही  रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत .

क्षरण (Corrosion)

              लोखंडाची वस्तू गंजते. (Rusts) म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. या क्रियेस धातूंचे क्षरण म्हणतात. क्षरणामुळे वस्तू कमकुवत होतात. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांमुळे क्षरण होते.

              क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात. त्याला गॅल्व्हनायझेशन म्हणतात. तांब्यापितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात. याला आपण कल्हई करणे असे म्हणतो.

             तंत्रज्ञानाच्या युगात पावडर कोटिंग सारखी नवीन पद्धती विकसित झाली आहे. पावडर कोटिंगमध्ये विविध रंगछटा असणारे लेप लोखंड, अल्युमिनिअम अशा विविध धातूंवर दिले जातात. यामुळे क्षरण होत नाही.

Leave a Comment